कुर्ल्यामध्ये झालेल्या बस अपघातात 7 निष्पाप जणांनी जीव गमावला. गजबजलेल्या परिसरात अवघ्या 15 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. कुर्ला डेपोतून बाहेर पडलेल्या इलेक्ट्रीक बस चालकाचा ब्रेकऐवजी एक्सलेटर पाय पडला आणि मोठी दुर्घटना घडली. बसने एकदम 70 चा स्पीड घेतला आणि यामुळे सात जणांचा बळी गेला. डेपोतून बस बाहेर पडल्यावर पहिल्याच स्पीड ब्रेकवर चालक संजय मोरे यांचा पाय एक्सलेटर पडला. गाडीने एकदम 60 ते 70 चा स्पीड घेतला. वाहकाने घंटीही वाजवली, पण मोरे यांचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थांबवणं शक्य झालं नाही. आधीच अरुंद वाट त्यात दुर्तफा वाहतूक सुरु असल्याने समोर येणाऱ्यांना वाचवण्यासाठी चालकाने गाडी वळवण्याचा प्रयत्न केला आणि दुर्घटना घडली. अपघातग्रस्त बसमध्ये 50 ते 60 प्रवासी होते. या दुर्घटनेत प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला. डोळ्यासमोर सुरु असलेला मृत्यूचा थरारक प्रवास थांबवण्यासाठी बसमधील प्रवाशांची धडपड सुरु होती. मोरेचं नियंत्रण सुटलेली बस वाहनांसह माणसांना चिरडत 200 ते 250 मीटर अंतरापर्यंत वेगाने जात आंबेडकर नगरच्या कमानीला धडकली. या अपघाता 7 जणांचा मृत्यू झाला असून 48 जण जखमी झाले.