Jhund Movie : आज बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असलेला झुंड (Jhund Hindi Cinema) चित्रपट प्रदर्शित होत आहे.

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित हा चित्रपट नागपुरातील नावाजलेले फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे (Vijay Barse) यांच्या आयुष्यावर आधारित आहे.



आज सर्वत्र झुंडची चर्चा होत असताना विजय बारसे नेमके आहेत तरी कोण असा देखील सवाल अनेकांना पडला आहे.

विजय बारसे यांनी 21 वर्षांपूर्वी नागपुरात स्लम सॉकर (Slum Soccer) अर्थात झोपडपट्टी फुटबॉलची सुरुवात केली होती.

झोपडपट्टीतील वातावरणात वाईट सवयी, अमली पदार्थांच्या आहारी जाऊन अनेक मुले गुन्हेगारी विश्वात जात असल्याचे विजय बारसे यांच्या लक्षात आले.

त्यानंतर विजय बारसे यांनी वर्ष 2000 मध्ये स्लम सॉकरची संकल्पना मांडली. फुटबॉल या क्रीडा प्रकाराच्या माध्यमातून झोपडपट्टीतील मुलांना शिस्तबद्ध फुटबॉलपटू तर बनवता येईल.

शिवाय त्यांच्या जीवनाला योग्य वळण लावत गरीब कुटुंबातील मुलांना प्रगतीची नवी संधी ही उपलब्ध करून देता येईल असे विजय बारसे यांचे उद्दिष्ट होते.

त्यासाठी विजय बारसे यांनी नागपुरातील बोखारा भागात झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण तसेच जवळच्या शाळेत त्यांच्या शिक्षणाची सोय करत अशी निवासी अकॅडमी सुरू केली.