भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे.
इंग्लंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिका तिच्या कारकिर्दीतील अखेरची मालिका असेल, असं तिनं काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा आज लॉर्ड्स येथे खेळला जातोय.
या मालिकेतील दोन्ही सामने जिंकून भारतानं मालिका खिशात घातलीय. या मालिकेतील अखेरचा सामना जिंकून गोस्वामीला विजयी निरोप देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघानं तीन सामन्यांच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 7 विकेट्सनं विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नाबाद 143 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतानं दुसरा एकदिवसीय सामना जिंकत मालिकेवर कब्जा केलाय.
झुलन गोस्वामी दिर्घकाळापासून संघाबाहेर होती. परंतु, इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत तिचं संघात पुनरागमन झालं.
इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेपूर्वी तिनं विश्वचषकात भारतासाठी अखेरचा सामना खेळला होता. मात्र, तिच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळण्यासाठी आज ती मैदानात उतरणार आहे.
झुलननं 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तिनं तिच्या कारकिर्दीतील पहिला सामना इंग्लंडविरुद्धच खेळला होता. हा सामना चेन्नई येथे खेळला गेला. या सामन्यात तिन सात षटकात 15 धावा खर्च करून दोन विकेट्स घेतल्या होत्या.