आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं आतापर्यंत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबीनं सात पैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. या हंगामात आरसीबीचा मधल्या फळीचा फलंदाज दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) चांगलं प्रदर्शन केलंय. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दिनेश कार्तिकची कामगिरी पाहून भारताचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) खूश झाले आहेत. तसेच आगामी टी-20 विश्वचषकात दिनेश कार्तिकचा भारतीय संघात समावेश करावा, अशी मागणी रवी शास्त्री केली आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये आरसीबीच्या संघानं त्याच्यावर बोली लावली. कार्तिकला 5.50 कोटीत विकत घेऊन आरसीबीनं त्याला संघात सामील केलं. फिनिशरची भूमिका साकारणाऱ्या कार्तिकनं आरसीबीनं दिलेल्या संधीचे सोनं केलं. कार्तिकनं आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यांमध्ये 210 धावा केल्या आहेत. या हंगामात अर्धशतक झळकावणारा कार्तिक सातपैकी सहा सामन्यांत नाबाद राहिला आहे. कार्तिकनं या मोसमात 200 हून अधिक स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.