भारतीयांसाठी चहा हे केवळ एक पेय नाही तर जीवनाचा अतूट भागच आहे. बहुसंख्य भारतीयांची सकाळ ही चहाने सुरु होते. आज जगभरात आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जातोय. आजच्या दिवसाचा उद्देश चहाच्या व्यापाराला प्रोत्साहन देणे आणि त्याच्या नैतिक आणि टिकाऊ उत्पादनावर लक्ष केंद्रीत करणे हा आहे. चीन, भारत, केनिया, व्हिएतनाम आणि श्रीलंका हे जगातील प्रमुख चहा उत्पादक देश आहेत. भारताने 2015 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या फूड अॅन्ड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनला आंतरराष्ट्रीय चहा दिवसाची व्याप्ती वाढवायचा प्रस्ताव दिला. म्यानमार आणि आसामच्या पर्वतीय भागात 1824 सालच्या दरम्यान चहाचे पानं सापडली. त्यानंतर इंग्रजांनी 1836 सालापासून चहाचे उत्पादन सुरु केलं. सुरुवातीला यासाठी चीनमधून चहाचे बी मागवले जायचे. चहामध्ये प्रोटिन, पॉलीसॅकेराइड, पॉलिफेनॉल, मिनरल्स आणि अमिनो, कार्बनिक अॅसिड, लिग्निन आणि मिथाइलक्सैन्थिन हे घटक असतात. चहामध्ये फायटोकेमिकल्स असतात जे आपल्या शरीरात शक्तिशाली अॅन्टीऑक्सिडन्ट्स म्हणून कार्य करतात.