भारतानं बांगलादेश दौऱ्यातील कसोटी मालिकेची विजयानं सुरुवात केली आहे. पहिला कसोटी सामनाा तब्बल 188 धावांच्या मोठ्या फरकाने भारतानं जिंकला आहे. या विजयासह भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एन्ट्रीसाठी भारताला हा विजय महत्त्वाचा होता. सामन्यात भारतानं पहिल्या डावात पुजाराच्या 90 तर श्रेयस अय्यरच्या 86 धावांच्या जोरावर 404 धावा केल्या. ज्यानंतर कुलदीपनं कमाल गोलंदाजी करत 5 तर सिराजनं 3 विकेट घेत अवघ्या 150 धावांवर बांगलादेशचा डाव आटोपला. ज्यानंतर पुजारा आणि गिलच्या शतकाच्या जोरावर भारतानं 258 धावा करत दुसरा डाव घोषित केला. ज्यामुळं 513 धावांचं मोठं आव्हान बांगलादेशसमोर विजयासाठी होतं. दुसऱ्या डावात बांगलादेशनं झुंज दिली पण अखेर कुलदीप आणि अक्षर यांच्या फिरकीसमोर बांगलादेशचे फलंदाज बाद झाले. बांगलादेशचा संघ 324 धावांवर सर्वबाद झाला आणि भारत 188 धावांनी सामना जिंकला. आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबर रोजी होणार आहे.