हाँगकाँगमध्ये एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आलं आहे. 28 वर्षीय सुप्रसिद्ध मॉडेल ॲबी चोई मंगळवारी (21 फेब्रुवारी) बेपत्ता झाली होती.



ॲबी बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांनी सूप पॉटमध्ये तिची कवटी आणि फ्रिजमध्ये मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत.



पोलिसांना तपासादरम्यान, ताई पो जिल्ह्यातील एका घरात ॲबीची कवटी आणि मृतदेहाचे तुकडे आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे.



मृतदेहाचे तुकडे पाहून पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे.



पोलिसांना या घरात एक इलेक्ट्रिकल कटर आणि मांस कापण्यासाठी वापरली जाणारी मशीन आणि काही कपडेही सापडले आहेत.



ॲबी चोई अचानक बेपत्ता झाली. यावेळी तिचा शोध घेण्यात आला आणि पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली.



प्रकरण हाय प्रोफाईल असल्यामुळे याकडेही प्रसारमाध्यमांचंही लक्ष लागलं होतं. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा वेगाने तपास करत होते.



दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांना ताई पो जिल्ह्यातील एका घराची माहिती मिळाली. बेपत्ता होण्याआधी ॲबी चोई या ठिकाणी दिसली होती.



पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, ताई पोमधील घरामध्ये छापेमारी करत तपास केला. पोलिसांनी घराची झडती घेतली असता ॲबी चोई कुठेच आढळून आली नाही.



मात्र घरात ठेवलेला फ्रिज उघडला असता फ्रिजमध्ये मानवी पाय आणि मृतदेहाचे तुकडे पाहून पोलिसांना धक्काच बसला.



हाँगकाँग पोलिसांनी या हत्येप्रकरणी चार जणांवर आरोप केले आहेत.



चोईच्या हत्येचा आरोप असलेल्यांमध्ये तिचा पूर्वाश्रमीचा पती ॲलेक्स क्वांग, त्याचे वडील क्वांग काऊ आणि ॲलेक्सचा भाऊ अँथनी क्वांग यांचा समावेश आहे.



यासोबतच ॲलेक्सची आई म्हणजेच ॲबीची पूर्वाश्रमीची सासू जेनी ली वरही पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲबी चोईचा तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि त्याच्या कुटुंबाशी 100 दशलक्ष डॉलरच्या मालमत्तेवरुन आर्थिक वाद सुरु होता. हेचं तिच्या मृत्यूचं कारण ठरल्याचं सांगितलं जातं आहे.