सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश चीन सध्या घटत्या लोकसंख्येमुळे चिंतेत आहे. त्यामुळे चीन सरकार लोकसंख्या वाढीसाठी नवनवीन योजना आणि उपक्रम राबवताना दिसत आहे. आता चीनने घटत्या लोकसंख्येवर उपाय म्हणून नवीन ऑफर आणली आहे. चीनमधील तरुण पिढी लग्नाकडे पाठ फिरवत आहे. येथील तरुण लग्न करणं टाळत आहेत. यामुळे जन्मदर घसरला असून येत्या काळात चीनसाठी अनेक अडचणी वाढू शकतात. या समस्येला तोंड देण्यासाठी चीन सरकारने आणखी एक ऑफर आणली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीन सरकार आता नवविवाहित जोडप्यांना विशेष वैवाहिक रजा देत आहे. तसेच नवविवाहित जोडप्यांना 30 दिवसांची सुट्टीही देण्यात येत आहे. पीपल्स डेलीच्या बातमीनुसार, ही सुट्टी देण्यामागचा सरकारचा उद्देश आहे की, अधिकाधिक तरुणांनी लग्न करावं आणि यामुळे देशातील प्रजनन दरही वाढेल. दिवसेंदिवस घटता जन्मदर आणि तरुणांची घटती लोकसंख्या यामुळे सध्या चीन सरकार खूपच चिंतेत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी सरकार सातत्याने अनेक योजना आणत आहे. चीन अनेक वर्षांपासून घटत्या लोकसंख्येशी झगडत आहे. त्यामुळे सरकारकडून नागरिकांना विविध प्रकारच्या ऑफर लोकांना दिल्या जात आहेत, मात्र तरीही परिस्थिती सुधारताना दिसत नाहीय.