मीठ ( Salt ) हा आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो.
मिठामुळे जेवणाला चव येते, पण मिठाचं अधिक सेवन आरोग्यासाठी घातक ठरु शकतं.
कार्डिओव्हस्कुलर रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, शास्त्रज्ञांना आढळून आले आहे की जास्त मिठाच्या सेवनामुळे स्ट्रेस हार्मोनची पातळी 75 टक्क्यांनी वाढते.
मिठाचं अधिक सेवन केल्याने हृदय, रक्तवाहिन्या आणि मूत्रपिंडांचं नुकसान होते, हे बहुतेकांना ठाऊक असेल. पण यामुळे तणावही वाढतो हे आता अभ्यासातून समोर आलं आहे.
आपण जे अन्न खातो त्यामध्ये असलेले मीठ आपले मानसिक आरोग्य कसे बदलते, हे समजून घेण्यासाठी आणि त्या दृष्टीने बदल करण्यासाठी हे संशोधन एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
जास्त मिठाचं सेवन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.
जास्त मीठ खाल्ल्याने आपले हृदय, रक्तवाहिन्या आणि मूत्रपिंडांचे नुकसान होते.
तसेच आपल्या अन्नातील जास्त मीठ आपल्या मेंदूचा ताण हाताळण्याच्या पद्धतीमध्ये देखील बदल करतो, असं या अभ्यासात समोर आल्याचं बेली यांनी सांगितलं आहे.
एडिनबर्ग विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी उंदरांवर संशोधन केलं. संशोधकांना असे आढळून आले की, कमी मीठ सेवन करणाऱ्या उंदरांपेक्षा जास्त मीठ सेवन करणाऱ्या उंदारामध्ये स्ट्रेस हार्मोनची पातळी दुप्पट होती.
तज्ज्ञांनी याबाबत पुढे सांगितलं आहे की, जास्त मीठ सेवन केल्याने व्यक्तीच्या स्वभावात अधिक आक्रमकता येते की नाही हे ठरवण्यासाठी पुढील अभ्यास सुरू आहेत.