टी20 विश्वचषक 2022 संपल्यापासून, हार्दिक पांड्याने टी20 फॉरमॅटमधील तीन मालिकांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. टी20 संघाचा कर्णधार म्हणून तो जबाबदारी निभावत आहे. त्याने टी20 कर्णधार म्हणून तिन्ही मालिका जिंकल्या आहेत. यादरम्यान, हार्दिकने फलंदाज आणि गोलंदाज अशा दोन्ही भूमिका सक्षमपणे निभावल्या. न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत हार्दिकला प्लेयर ऑफ द सिरीजचा किताब देण्यात आला. हार्दिकने या मालिकेत 66 धावा केल्या, तर एकूण 5 विकेट्सही घेतल्या. यासोबतच हार्दिकच्या नावावर आणखी एक विक्रम जमा झाला आहे. तो T20 फॉरमॅटमध्ये 4000 हून अधिक धावा आणि 100 हून अधिक बळी घेणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. आयपीएलमधील आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान निर्माण करणारा पांड्या दमदार फॉर्मात आहे. सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वात दमदार अष्टपैलू खेळाडू म्हणून गणला जात आहे. IPL 2022 च्या हंगामात कर्णधार म्हणून स्वतःला सिद्ध करत हार्दिकने त्याच्या पहिल्या IPL मोसमात गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून दिले.