देशात व्हायरल फ्लूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. H3N2 इन्फ्लुएंझामुळे रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांकडून फ्लू वॅक्सिन घेण्याचं आवाहन केलं जात आहे. दिल्ली एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी नागरिकांना घाबरुन न जाता योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. H3N2 हा व्हायरल फ्लू असून हा विषाणू H1N1 विषाणूचं म्युटेशन म्हणजे बदलेला प्रकार आहे. डॉ. रणदिप गुलेरिया यांनी H3N2 इन्फ्लुएंझापासून बचाव करण्यासाठी कोविड उपायांचा अबलंब करण्यास सांगितलं आहे. मास्क, लस आणि सॅनिटायझेशन ही त्रिसूत्री वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. व्हायरल H3N2 इन्फ्लूएंझामुळे देशात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक आणि हरियाणामध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र, नागरिकांनी घाबरुन जाण्याचं कारण नाही. हा सौम्य संसर्ग असून याची जास्त भीती बाळगण्याची गरज नाही. दरम्यान, गंभीर आजाराच्या रुग्णांनी याकडे दुर्लक्ष न करता, आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, असं आवाहनही डॉक्टरांनी केलं आहे.