सध्या कोरोना रुग्णांमध्ये घट झाली असली तरी नव्या विषाणूनं डोकं वर काढलं आहे. हवामान बदलामुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला या समस्यांना तोंड द्यावं लागतंय.



सध्या देशात इन्फ्लूएंझा A चा H3N2 व्हायरसचा संसर्ग वाढला आहे. H3N2 मुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.



दरम्यान, मेदांताचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी नागरिकांना घाबरू नका असा सल्ला दिला आहे.



डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं की, देशात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला आहे. पण सर्दी-खोकला आणि ताप या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.



अनेक राज्यांमध्ये इन्फ्लूएंझा A चा उपप्रकार H3N2 व्हायरसचा संसर्ग वाढला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.



दरम्यान, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार H3N2 व्हायरसचा संसर्ग दरवर्षी या वेळी पाहायला मिळतो.



H3N2 व्हायरस हा H1N1 व्हायरसचा म्युटेट स्ट्रेन असल्याची माहिती डॉ. गुलेरिया यांनी दिली. त्यांनी सांगितलं की, या व्हायरसमध्ये वेळेनुसार बदल होतो.



H3N2 विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून मास्क घालण्याचा, हात वारंवार धुण्याचा आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.



डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं आहे की, या इन्फ्लूएंझापासून गंभीर आजाराचे रुग्ण आणि वृद्धांनी काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी लस घेणं आवश्यक आहे.



तसेच, इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) या व्हायरसला हंगामी ताप म्हटलं आहे, हा विषाणू पाच ते सात दिवस टिकतो.



IMA ने संक्रमित व्यक्तीला अँटीबायोटिक घेणं टाळण्याचा सल्ला दिला आहे.