आपल्या लग्नात आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येक नवरा आणि नवरीची इच्छा असते. यासाठी तरुण-तरुणी मेकअपसाठी हजारो रुपयेही खर्च करतात. ब्रायडल मेकअपसाठी ब्युटी पार्लर आणि ब्युटीशियन हजारो रुपये घेतात. तरुणींची मेकअपच्या बाबतीत खास अपेक्षा असतात. हीच अपेक्षा एका तरुणीला महागात पडली आहे. एका तरुणीला लग्नासाठी मेकअप करणं चांगलंच महागात पडलं आहे. मेकअपमुळे तरुणीची तब्येत एवढी बिघडली की, तिला थेट रुग्णालयात दाखल करावं लागलं. मेकअप केल्यानंतर मुलीचा चेहरा इतका बिघडला की तिला अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करावं लागलं. इतकंच नाही तर यामुळे तिचं लग्नही पुढे ढकलण्यात आलं. हे प्रकरण समोर आल्यानंतर तरुणीचा मेकअप करणाऱ्या ब्युटीशियनला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे ज्या ब्युटी पार्लरमधून पीडित तरुणीने मेकअप करुन घेतला ते हर्बल ब्युटी पार्लर होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कर्नाटकातील जाजूर गावची रहिवासी आहे. पीडितेने 10 दिवसांपूर्वी शहरातील गंगाश्री हर्बल ब्युटी पार्लर अँड स्पामध्ये मेकअप ट्रीटमेंट करुन घेतली होती. मेकअप केल्यानंतर पीडितेचा चेहरा काळा पडला आणि चेहऱ्यावर सूज आली. त्यानंतर पीडितेचा चेहरा इतका सुजला की तिला रुग्णालयात ICU मध्ये दाखल करावं लागलं. 3 मार्चला ही घटना उघडकीस आली. पीडितेने सांगितलं होतं की, तिच्या चेहऱ्यावर नवीन प्रकारचे मेकअप प्रॉडक्ट्स लावले होते.