पुढच्या वर्षी लवकर या... चैन पडे ना आम्हाला... अशी भावनिक साद घालत भाविकांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला, लालबाग-परळकरांसोबतच अखंड गिरणगाव आणि जगभरातील भक्तांचं श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजाने भक्तांचा निरोप घेतला. फोर्टच्या राजाचंही गिरगावमधील समुद्रात विसर्जन करण्यात आलं. सुमारे 22 तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर आज गणपतींच्या विसर्जनाने गणेशोत्सवाची सांगता झाली. सकाळी नऊ वाजता लालबागचा राजा गिरगावच्या समुद्रात विसर्जित झाला. काल सकाळी साडे अकराच्या सुमारास लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाला बोटींची सलामी देण्यात आली. चौपाटीपासून काही अंतरावर आत अरबी समुद्रात जात लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी यावेळी भाविकांचा जनसागर उसळला होता.