परदेशी फ्लेमिंगो पक्षांमुळे नवी मुंबईतील खाडी किनारी गेल्या काही दिवसांपासून पाण्यावर गुलाबी चादर तरंगताना दिसू लागली आहे.

ऐरोली ते पनवेलपर्यंत पसरलेल्या या खाडीमधील फ्लोमिंगो पाहण्यासाठी पक्षीप्रेमी गर्दी करू लागले आहेत.

या फ्लेमिंगोचा मे महिन्यापर्यंत खाडी किनारी मुक्काम राहणार आहे.

ठाणे, नवी मुंबई, पनवेल अशा विस्तीर्ण भागात पसरलेल्या खाडी किनाऱ्यावरील वातावरण फ्लोमिंगो पक्षासाठी पोषक असल्याने थंडीत त्यांचे मोठ्या संख्येने दर्शन होवू लागले आहे.

ऐरोलीमध्ये वनविभागाने सुरू केलेली फ्लेमिंगो सफारी रोज फूल जावू लागली आहे.

जगात सहा जातीचे फ्लेमिंगो असले तरी नवी मुंबईच्या खाडीमध्ये सध्या लेसर आणि ग्रेटर असे दोन जातीचे फ्लेमिंगो पहायला मिळत आहेत.

लेसर जातीचे फ्लेमिंगो गुजरात मधील कच्छ येथून येतात तर ग्रेटर जातीचे फ्लेमिॅगो परदेशातील सायबेरिया आणि कझाकिस्तान मधून हजारो किलो मीटर प्रवास करून नवी मुंबईतील खाडीकिनारी स्थलांतरीत होत असतात.

परदेशात या काळात थंडीचा मोसम आणि बर्फवृष्टी होत असल्याने त्यांची भारताला पसंती असते.

नवी मुंबईच्या खाडीकिनारी 206 विविध जातीचे पक्षी वास्तव्यास असल्याने पक्षीप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरू लागली आहे.

फ्लेमिंगोंच्या येण्याने नवी मुंबईच्या खाडी किनारी विलोभनीय नजराणा पाहायला मिळत आहे.

मु्ंबईच्या बाहेरून देखील फ्लेमिंगोंचा हा नजराणा पाहण्यासाठी पक्षी प्रेमी येत आहेत.