जपान दौऱ्यावरुन परतलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यशस्वी जपान दौऱ्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन करुन सत्कार केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जपानने विशेष अतिथी म्हणून देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केलं होतं. देवेंद्र फडणवीस शनिवारी (26 ऑगस्ट) पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावरुन भारतात परतले. जपानमध्ये फडणवीस यांनी मंत्री, पंतप्रधानांचे सल्लागार, कंपन्यांचे अधिकारी, राज्यपाल, एजन्सींसोबत विस्तृत चर्चा केली. जपानमधील गुंतवणूकदार महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे, असं फडणवीस यावेळी म्हणाले. जपान दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांना कोसायन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली. त्याबद्दल देखील डॉ. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.