भारतीय महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्ति विवाहबंधनात अडकली आहे. वेदाने कर्नाटकचा रणजी क्रिकेटपटू अर्जुन होयसालासोबत लग्न केले आहे. वेदाने सोशल मीडियावर फोटोसोबत खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही खूशखबर दिली आहे. वेदाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तिचे अभिनंदन केले आहे. यासोबतच अनेक सेलिब्रिटींनीही शुभेच्छा दिल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे वेदाच्या दिवंगत आईच्या वाढदिवसाच्या दिवशी या दोघांनी लग्न केलं आहे. वेदाच्या आईचे 2021 मध्ये कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांनंतर तिची बहीण वत्सला शिवकुमार हिचंही निधन झालं. वेद आणि अर्जुन यांनी बेंगळुरू येथील सब-रजिस्ट्रार कार्यालयात अत्यंत साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज करत लग्नाचे विधी पूर्ण केले. यावेळी हे दोघेही अत्यंत साध्या कपड्यांमध्ये दिसले. कुटुंबातील काही सदस्य आणि जवळच्या मित्रमंडळीच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केले. इंस्टाग्रामवर वेदाने पोस्ट शेअर करत लिहिले आहे, 'आई हे तुझ्यासाठी आहे. तुझा वाढदिवस नेहमीच खास असेल.'