जगभरासह भारतातही कोरोनाचा धोका कायम आहे. देशात कोरोनाचा संसर्ग किचिंत घटताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशात आज 347 नवीन कोरोनाबाधित सापडले असून गेल्या 24 तासांत तीन रुग्णांचा कोरोनामुळए मृत्यू झाला आहे. एकीकडे कोरोनाचं उगम स्थान समजलं जाणाऱ्या चीनने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. चीनमध्ये गेल्या 24 तासांत 32,943 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याच्या तुलनेनं भारतात कोरोना संसर्गात सातत्यानं घट होताना पाहायला मिळत आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. देशात सध्या 5 हजार 516 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. ही संख्या 5 हजार 881 इतकी होती. गेल्या 24 तासांत तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील कोरोनाबळींचा एकूण आकडा 5 लाख 30 हजार 604 वर पोहोचला आहे. आतापर्यंत देशात 4 कोटी 46 लाख 70 हजार 830 रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.