भारतात कोरोना विषाणू पुन्हा एकदा वेगाने हात-पाय पसरताना दिसत आहे. देशात पुन्हा एकदा हजारहुन अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.



देशात आज 1249 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशात सलग चौथ्या दिवशी नव्या कोरोना रुग्णांचा आकडा एक हजारहुन जास्त आहे.



देशात आतापर्यंत एकूण कोरोना संक्रमित रुग्णाची संख्या चार कोटींच्या पुढे गेली आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजे शुक्रवारी कोरोना विषाणूचे 1249 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.



त्याआधी गुरुवारी देशात 1300 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 7,927 वर पोहोचली आहे.



आज सापडलेल्या नवीन कोरोना रुग्णांची संख्या किंचित घटली असली तरी, कोरोना रुग्णांची संख्या 1000 च्या पुढे असणं, ही एक चिंताजनक बाब आहे.



कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंत देशात एकूण 4,47,00,667 जणांचा कोरोनाची लागण झाली आहे.



यापैकी चार कोटीहून अधिक कोरोना रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत. तसेच 5 लाख 30 हजारहून अधिक रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे की, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकला 5 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी (24 मार्च) नवीन आकडेवारी जाहीर केली आहे.



आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.



कर्नाटक आणि गुजरातमध्ये संसर्गामुळे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यासह देशातील मृतांचा आकडा 5,30,813 वर पोहोचला आहे.



आतापर्यंत देशात 92.07 कोटी कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत, यापैकी गेल्या 24 तासांत 1,05,316 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.



आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लसींचे 220.65 कोटी डोस देण्यात आले आहेत.