देशात गेल्या 24 तासांत हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.



कोविड रुग्णांमध्ये सातत्याने होत असलेली वाढ पाहता आरोग्य मंत्रालयाने रविवारी (19 मार्च) कोरोना उपचाराबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.



कोरोनासोबत इतर कोणतेही विषाणूजन्य संसर्ग आहे का याची नोंद घ्यावी, असं नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटलं आहे.



मास्कचा वापर करा, सुरक्षित सामाजिक अंतर राखा, शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन पातळीचे निरीक्षण करावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.



मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे की, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकला 5 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.



गंभीर लक्षणे किंवा उच्च ताप असलेल्या रुग्णांच्या बाबतीत पाच दिवसांसाठी रेमडेसिव्हिर औषधं घेतलं जाऊ शकतं पण, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावं.



गेल्या काही महिन्यांत देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली होती मात्र, आता पुन्हा कोविडबाधितांची संख्या वाढू लागली आहे.



गेल्या काही आठवड्यांत रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 129 दिवसांनंतर, भारतात एका दिवसात कोरोनाच्या एक हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.



देशात गेल्या 24 तासांत 1071 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत.



सध्या देशात कोरोनाचे 5,915 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.