कॅप्टन चाहत दलाल ही मिसेस गॅलेक्सी 2023 चा क्राऊन पटकावणारी पहिली भारतीय आहे. मिसेस गॅलेक्सी 2023 ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा टेक्सास येथे पार पडली. ही स्पर्धा जिंकल्यानंतर आता कॅप्टन चाहत दलाल ही भारतात परतली आहे. चाहतचं मुंबई विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेटवर चाहत दलालचे कुटुंब, मित्र आणि फॅन्स हे चाहतच्या स्वागतासाठी फुलं घेऊन रांगेत उभे होते. मिसेस इंडिया इंक डॉट या संघाने चाहतच्या स्वागताचे आयोजन केले होते. मिसेस इंडिया इंक डॉटच्या (Mrs. India Inc.) संस्थापक मोहिनी शर्मा या चाहत दलालचे स्वागत करण्यासाठी खूप उत्साहित होत्या. वयाच्या 18 व्या वर्षापासून कॅप्टन चाहत दलाल ही वेगवेगळ्या सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे. तिनं आत्तापर्यंत 13 वेळा मिसेस गॅलेक्सी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. मिसेस गॅलेक्सी 2023 जिंकण्याआधी तिनं RSI मे क्वीन, मिस पुणे आणि मिर्ची क्वीनबी या स्पर्धा जिंकल्या आहेत. 2014 मध्ये कॅप्टन चाहत दलालनं मिस डिवा (Miss India Universe) या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी टॉप-7 स्पर्धकांमध्ये कॅप्टन चाहत दलालनं स्थान मिळवलं. तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट फेमिना मिस इंडिया 2015 हा होता. मिसेस गॅलेक्सी 2023 ही स्पर्धा जिंकल्यानंतर आता देशभरातील लोक कॅप्टन चाहत दलालचं कौतुक करत आहेत.