ढोबळी मिरचीवर 'ब्लॅक थ्रीप्स' या फूलकिडीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले असून मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

सिमला मिरची उत्पादक शेतकरी या किडीच्या प्रादुर्भावामुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे.

महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा विभागामध्ये तसंच आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये मिरचीवर नव्या प्रजातीचे फूलकिडे आढळत आहेत.

त्याचे शास्त्रीय नाव 'थ्रीप्स पार्विस्पिनस' असे आहे. फुलकिडीच्या थ्रीप्स पार्विस्पिनस या प्रजातीचे मूळ उगमस्थान इंडोनेशिया आहे.

ही प्रजाती भारतामध्ये 2015 मध्ये प्रथम पपई या पिकावर आणि त्यानंतर दक्षिण भारतातील फूल पिकांवर आढळली होती.

ब्लॅक थ्रीप्समुळे ढोबळी मिरची उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे अनेक शेतकरी मिरचीची पिके काढून फेकत आहेत.

या रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून मिरची उत्पादनात प्रचंड अशी घट झाली आहे.

एकरी दोन लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांनी खर्च केला असला तरी त्यांच्या हाती तितकेही उत्पादन येणार नसल्याची परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे.

फूलकीड आकाराने लहान असून, पानाखाली आणि वर राहते. ती डोळ्यांना सहज दिसू शकते.

प्रौढ किडींपेक्षा पिले जास्त नुकसान करतात. या किडीच्या प्रार्दुभावामुळे पानांच्या कडा वरील बाजूस वळतात.