तुम्ही आम्ही प्रत्येकाने कधी ना कधी काठोकाठ पाण्यानं भरलेली विहीर नक्कीच बघितलेली आहे.


पण आज आम्ही तुम्हाला जी विहीर दाखवणार आहोत तशी विहीर तुम्ही नक्कीच यापूर्वी कधीच पाहिलेली नसेल



बीड जिल्ह्यातल्या पाडळसिंगी गावच्या मारुती बजगुडे या शेतकऱ्यानं दीड कोटी रुपये खर्च करून ही विहीर बांधली आहे.



41 फूट खोल आणि दोनशे दोन फूट रुंद असलेल्या या विहिरीमध्ये सध्या दहा कोटी लिटर एवढा पाणीसाठा त्यांनी करून ठेवला आहे.

धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गालगत बजगुडे यांची ही बारा एकर शेती आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी मिळत नव्हते. म्हणून त्यांनी एक एकरमध्ये विहीर करण्याचा निर्णय घेतला. बजगुडे यांचा मूळ व्यवसाय हा मंडप डेकोरेशनचा आहे.



ही विहीर पूर्ण बांधण्यासाठी त्यांना नऊ महिन्याचा कालावधी लागला.



यामधून निघालेलं जे मटेरियल आहे त्याची विक्री करून त्यातून मिळालेले 10 ते 12 लाख रुपय त्यांना विहीर बांधण्यासाठी कामी आले.



आता या विहिरीच्या पाण्यावर त्यांनी बागायती शेती करायला सुरुवात केली आहे. बजगुडे यांनी बांधलेली ही एवढी मोठी विहीर आता इतर शेतकऱ्यांसाठी आकर्षण ठरतेय.