औरंगाबाद जिल्ह्यातील संतप्त टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी आपले टोमॅटो पेटवून दिले. औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील गवळीशिवरा मार्केटमध्ये भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो पेटवून दिला. काही दिवसांपूर्वी टोमॅटो 200 रुपये प्रति किलो दरानं विकला जात होता. मात्र आता हा दर 40 रुपये प्रति क्रेट इतका खाली आला आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकत त्याला आग लावली. शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. एकीकडे जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याचा सन्मान करायचा अन् दुसरीकडे भाव पाडायचे असा उद्विग्न सवाल शेतकरी विचारत आहेत. 'शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण' अशी परिस्थिती असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला 2500 रुपयांपर्यंत प्रति कॅरेट भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. एकीकडे प्यायला पाणी नाही, तरीही शेतकरी पिके जगवत आहेत, याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे शेतकरी म्हणाले.