माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांना कलेची आवड आहे. त्यामुळे त्यांनी 75 व्या 'कान्स चित्रपट महोत्सवाला' हजेरी लावली होती. 75 व्या 'कान्स चित्रपट महोत्सवा'त अमृता फडणवीसांनी 'अन्न, आरोग्य आणि शाश्वत विकास' यासंबंधी जनजागृती केली होती. दरम्यान अमृता फडणवीस यांनी महोत्सवातील मास्टरमाइंड फोरममध्ये जनजागृती करणारे भाषणदेखील केले. महोत्सवात सकारात्मक जनजागृती केल्यामुळे तसेच चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना 'कान्स चित्रपट महोत्सवा'त पुरस्कार देण्यात आला आहे. अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत पुरस्कारासंदर्भात माहिती दिली आहे. अमृता फडणवीस यांचा कान्स लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अमृता फडणवीस यांनी आजपर्यंत अनेक गाणी गायली आहेत. सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांचा मोठा चाहतावर्ग आहे.