कोकणात सतत बदलत्या वातावरणाचा परिणाम निसर्गातही पाहायला मिळत आहे.

ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत पडला असतानाच सिंधुदुर्गातील किनारपट्टी भागात आंबा कलमांना मोहोर आला आहे.

तर वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे गावात किल्लेनिवती भागात हापूसला आंबे आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

भर पावसाळ्यात कोकणात हापूस आंब्यांना मोहोर आल्याने सर्वांना कुतूहल वाटतं आहे.

भर पावसाळ्यात आलेला मोहोर प्रगतशील आंबा बागायतदारांनी टिकवून ठेवल्यास त्यांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.

त्यासाठी फवारण्या आणि आच्छादन करुन मोहोर टिकवून त्यांची फळं बाजारपेठेत आल्यास बागायतदारांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. 

मे महिन्यात आलेला मोहोर आणि जून महिन्यात पावसाने मारलेली दडी यामुळे मोहोर टिकून आता किल्लेनिवतीमध्ये हापूस आंबे लागल्याचं चित्र आहे.

ज्यांच्या आंबाच्या झाडांना ही फळं लागली आहेत त्याच्या मते ही गणरायाची कृपा आहे.

त्यामुळे ही आंब्याची फळं बाप्पाच्या चरणी प्रसाद म्हणून ठेवणार आहेत.

मात्र निसर्गात होणाऱ्या बदलांमुळे हे सगळं घडत असून वातावरणातील बदलामुळे भर पावसाळ्यात हापूस आंबे लागल्याचं चित्र तळकोकणात पाहायला मिळत आहे. 

वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे गावातील किल्लेनिवती भागात हापूस आंब्याला फळधारणा चांगली चर्चा सर्वत्र होत आल्याने अनेकांना नवल वाटत आहे.

त्यामुळे कुतूहलाने अनेक जण पर्यटनाला फिरायला जात असताना हापूस आंब्यांच्या झाडाजवळ येऊन सेल्फी देखील घेत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

सध्या बदलत्या वातावरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागात मात्र हापूस आंब्यांना मोहोर आल्याचं चित्र दिसत आहे.