आदित्य नारायणच्या घरी मुलीचा जन्म!

बॉलिवूड गायक-अभिनेता आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवाल हे आई-वडील झाले असून, त्यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला आहे.

श्वेताने 24 फेब्रुवारीला मुंबईत एका मुलीला जन्म दिला. आदित्यने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

आदित्यने सांगितले की, त्याला नेहमीच मुलगी हवी होती आणि देवाने आता त्याचे ऐकले. गतवर्षी आदित्यने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून, श्वेताच्या गरोदरपणाची माहिती दिली होती.

आदित्य नारायण याने बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सगळे त्याला सांगत होते की, मुलगा होईल पण, मला मुलगी होईल अशी आशा होती. मला विश्वास आहे की, मुली त्यांच्या वडिलांच्या खूप जवळ असतात आणि मला खूप आनंद झाला की, माझ्या घरीही चिमुकली आली आहे. श्वेता आणि मला खूप आनंद झाला आहे. आम्ही आता पालक झालो आहोत.

मुलीच्या जन्माबाबत बोलताना आदित्य म्हणाला की, ‘प्रसूतीच्या वेळी मी सतत श्वेताच्या सोबत होतो. एका बाळाला जन्म देताना स्त्रिया प्रचंड वेदना सहन करतात. श्वेताबद्दल माझा आदर आणि प्रेम दुप्पट झाले आहे. जेव्हा, एखादी स्त्री मुलाला जन्म देते, तेव्हा तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो.’

आदित्यने सांगितले की, त्याच्या मुलीचा संगीत प्रवास आतापासून सुरू झाला आहे. मी आतापासून तिच्यासाठी गाणी म्हणायला सुरुवात केली आहे.

संगीत तिच्या डीएनएमध्येचं आहे. माझ्या बहिणीनेही तिला एक छोटा म्युझिक प्लेअर भेट दिला आहे.

ज्यामध्ये नर्सरीमध्ये राईम्स आणि अध्यात्मिक संगीताचा आनंद घेता येतो. अगदी जन्मतःच तिचा हा सांगीतिक प्रवास सुरु झाला आहे.