आज (12 सप्टेंबर) अभिनेत्री प्राची देसाई आपला वाढदिवस साजरा करत आहे. प्राची देसाईचा जन्म 12 सप्टेंबर 1988 रोजी गुजरातमध्ये झाला. सुरतमधून सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्राची पुढील शिक्षणासाठी पुण्यात आली. प्राचीला सुरुवातीपासूनच अभिनयाची गोडी होती. म्हणून पुण्यात आल्यावर तिने अभिनयात नशीब आजमावण्याचा विचार केला. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी प्राचीला एकता कपूरच्या 'कसम से' या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेत प्राची तिच्यापेक्षा 16 वर्षांनी मोठा असलेल्या राम कपूरसोबत मुख्य भूमिकेत झळकली होती. 2006 मध्ये प्रसारित झालेल्या 'कसम से' या मालिकेतील बानी कपूरच्या व्यक्तिरेखेतील प्राचीचा साधेपणा सर्वांनाच आवडला आणि ती घरोघरी लोकप्रिय झाली. प्राची देसाईने केवळ दोन मालिकांमध्ये काम केले. यानंतर तिला 2008मध्ये फरहान अख्तरसोबत 'रॉक ऑन' या चित्रपटाची ऑफर मिळाली.