साऊथ आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सनं क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट्समधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. एबी डिव्हिलियर्सनं बराच काळापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु, आता क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती मिळत आहे. आता एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. 37 वर्षांच्या एबी डिविलियर्स आयपीएलच्या सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. एबीनं 184 आयपीएल सामन्यांमध्ये 39.70 च्या सरासरीनं 5162 धावा केल्या. ज्यामध्ये तीन शतक आणि 40 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल 14 च्या पहिल्या सत्रात एबी डिव्हिलियर्सनं धडाकेबाज खेळी केली होती. या दरम्यान, एबी डिव्हिलियर्सनं सात सामन्यांमध्ये एकूण 207 धावा केल्या होत्या. दरम्यान, दुसऱ्या सत्रात मात्र एबी डिव्हिलियर्स फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. आयपीएलमध्ये एबी डिव्हिलियर्स आरसीबी व्यतिरिक्त दिल्ली डेयरविल्सकडूनही खेळताना दिसला होता.