Pooja Khedkar Case : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या प्रशिक्षणाला ब्रेक;मसुरीला पुन्हा बोलावलं
मुंबई : पूजा खेडकरांच्या (IAS Pooja Khedkar ) बाबतीत मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांचा महाराष्ट्रातील प्रशिक्षण कालावधी संपवण्यात आला असून मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत परत बोलावण्यात आलं आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली.
23 जुलै पूर्वी मसूरी येथील अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरण यामुळे प्रोबेशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र बोगस असल्याचं समोर आलं. याच मुद्द्यांवर पंतप्रधान कार्यालय आणि मसूरी येथील लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली आहे.
कार्मिक मंत्रायलाच्या समितीचा चौकशी सुरू
पूजा खेडकरांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वापरून परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय. तसेच त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असतानाही त्यांनी ओबीसी नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट काढल्याचं समोर आलं. आता या सर्व प्रकरणाची चौकशी केंद्र सरकार करणार आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने पूजा खेडकर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एकसदस्यीय समिती नेमली आहे. या समितीने आपला तपास सुरू केला असून दोन आठवड्यात त्याचा अहवाल मंत्रालयाला देण्यात येणार आहे.