Raj Thackeray on Matoshree : राज ठाकरे म्हणाले,मातोश्रीवर निघालो; शिवतीर्थबाहेर नेमकं काय घडलं?
Raj Thackeray on Matoshree : राज ठाकरे म्हणाले,मातोश्रीवर निघालो; शिवतीर्थबाहेर नेमकं काय घडलं?
Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान काल माध्यमांशी बोलताना जे जनतेच्या मनात आहे, तेच होईल. आता थेट बातमीच देऊ, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. याचदरम्यान राज ठाकरेंनी आज पत्रकारांना गुगली टाकल्याचं पाहायला मिळालं.
...अन् राज ठाकरे म्हणाले, मातोश्रीवर जातोय-
राज ठाकरे जेव्हा जेव्हा पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारतात. तेव्हा ते नेहमी पत्रकारांना गुगली टाकत असतात. आज राज ठाकरे शिवतीर्थवरुन कारमधून निघाले असताना पत्रकारांनी साहेब कुठे दौरा असा प्रश्न विचारला. यावर मातोश्रीवर जातोय, असं मिश्किल उत्तर राज ठाकरेंनी दिलं. त्यानंतर लगेच मी घरगुती कामासाठी बहिणीकडे जातोय, असं राज ठाकरे म्हणाले.
मनसेशी युती करणार का? या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी काल मोठं वक्तव्य केलं. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. आता संदेश नाही थेट बातमी देणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे काही आहे ते होणारच असे उद्धव ठाकरे म्हणाले. युतीच्या चर्चांवर आता कोणतेही संकेत देणार नाही, थेट बातमीच देतो असंही ते म्हणाले. युतीसंबंधी जे बारकावे असतील त्यावर आम्ही काय करायचे ते पाहू असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरेंचे हे वक्तव्य म्हणजे शिवसेना-मनसे युतीकडे पडलेलं पुढचं पाऊल असल्याची चर्चा आहे.
राज ठाकरेंच्या निवासस्थानी बैठकींचे धडाके-
मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु असतानाच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठकींचे धडाके सुरू आहेत. आज मनसेच्या केंद्रीय समितीची पुन्हा बैठक शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पार पडली. 2014 आणि 2017 या निवडणुकानंतर पुन्हा एकदा 2025 च्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे ब्रँड टिकवायला मनसेप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येतील ही चर्चा रंगली आहे. सलग तीन दिवसाच्या चर्चेनंतर मुंबईत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे मराठी माणसाचे गळ घालणारे पोस्टर्स पाहायला मिळत आहे. सोबत दोन्ही नेत्यांच्या मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येण्यासंदर्भात माध्यमांवर चर्चा केली. मात्र प्रत्यक्षात दोनही राजकीय पक्षांनी आपापल्या राजकीय ताकदीबाबत चाचपणी सुरू केली आहे.























