महापौरांनी एसआरए योजनेतील फ्लॅट लाटला, सोमय्यांचा आरोप; पेडणेकरांचं खुलं आव्हान
भिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईनंतर भाजप सातत्याने शिवसेनेवर हल्लाबोल करत आहे. म्हाडाने वर्षभरापूर्वी धाडलेल्या नोटीसवर बोट ठेवत अनिल परब यांच्यावर आरोप केल्यानंतर भाजपने आपला मोर्चा मुंबईच्या महापौरांकडे वळवला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी एसआरए योजनेत फ्लॅट आणि ऑफिस लाटल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी एसआरए योजनेअंतर्गत गोमाता जनता सोसायटीमधील केवळ ऑफिसच नाही तर फ्लॅटही लाटला. त्यांच्या कुटुंबाच्या किश कॉर्पोरेट कंपनीने तळमजल्यावर सोसायटीच्या कार्यालयासाठी राखीव असलेली जागा लाटली, असा आरोप सोमय्या यांनी केला.
तर किरीट सोमय्या माझ्यावर खोटे आरोप करत आहेत. त्यांनी माझ्यावरील आरोप सिद्ध करावेत, आरोप सिद्ध झाले तर मी शिक्षा भोगेन, असं खुलं आव्हान महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान यावेळी किशोरी पेडणेकर आणि किरीट सोमय्या यांच्या शाब्दिक युद्ध रंगलं.






















