Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल
अहिल्यानगर : शिवसेना (Shivsena) पक्षातील ऑपरेशन टायगरनंतर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा आयोजित करत खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघातून त्यांनी फुटीर खासदारांवर तोफ डागली होती. त्यानंतर, विदर्भ, मराठवाडा आणि आज शिर्डीतील फुटीर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंनी आपल्या दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपवरही टीका केली. खासदार फुटीचं हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र असल्याचं त्यांनी म्हटलं. आता, शिर्डीतून (Shirdi) पुन्हा एकदा हाच धागा पकडत साईचरणी प्रार्थनाही केली.
ठाकरेंच्या शिवसेनेतील फुटीर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डी मतदारसंघात आज उद्धव ठाकरेंनी आपल्या सभेतून भाजप, एकनाथ शिंदेंसह फडणवीसांनाही लक्ष्य केलं. मी तुम्हाला सूचना करतोय, आपला खासदार पळालाय सापडला तर सोडू नका. काहीच्या रक्तामध्ये गद्दारी भरलेली असते, हे भाऊसाहेब नाही खाऊसाहेब वाकचौरे आहेत, जाऊ तिथं खाऊ. 2009 ला या गद्दारला निवडून आणलं 2014 ला हा पळाला, हा काँग्रेसमध्ये गेला तिकडे सुद्धा बट्याबोळ झाला. जरा वाकचौरे थांबला असता तर केंद्रात 2014 ला आपलं सरकार होतं, आता जरी थांबला असता तरी आपलं सुद्धा सरकार येणार आहे, असे म्हणत खासदार वाकचौरे यांच्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली.


















