Solapur : सोलापूर प्रशासनाकडून तीन पट ऑक्सिजनसाठा, Oxygen बाबत सोलापूर जिल्हा होणार स्वयंपूर्ण
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवड्यामुळे अनेक जिल्ह्यातील प्रशासनाला धावपळ करावी लागली होती. यातून धडा घेत सोलापूर जिल्हा कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी ऑक्सिजनबाबतीत स्वयंपूर्ण होतोय. सोलापूर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत सर्वाधिक 62 मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची गरज भासली होती. मात्र तिसऱ्या लाटेसाठी तीन पट ऑक्सिजन क्षमता निर्माण केली जात आहे.
जिल्ह्यात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन साठवण करणारे 16 प्लांट कार्यान्वित करण्यात येत आहेत. इतकंच नाही तर ऑक्सिजनबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी जिल्ह्यात 9 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प देखील सुरु करण्यात येत आहेत. यातील 4 प्रकल्प हे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात असून ते कार्यान्वित देखील झाले आहेत. उर्वरित प्रकल्प हे महिन्याभरात सुरु होणार आहेत. विशेष म्हणजे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात लावण्यात सुरु करण्यात आलेले दोन प्रकल्प हे अत्याधुनिक असे फोर्थ जनरेशनचे आहेत.
देशात तिसरे आणि राज्यात पहिलेच असे हे प्रकल्प आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात आता एकूण 190 मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजन साठा कऱण्याची क्षमता निर्माण होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.





















