Solapur Maratha Akrosh Morcha : सोलापुरात आज मराठा आक्रोश मोर्चा, परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलक ठाम
सोलापूर : मराठा आरक्षण मिळावे यासाठी सोलापुरात आज, 4 जुलै रोजी मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत हा मोर्चा जाणार आहे. या मोर्चासाठी खासदार छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, नारायण राणे, रामदास आठवले यांना निमंत्रण दिलं होतं मात्र यांपैकी कुणीही मोर्चाला येणार नसल्याची माहिती असून नरेंद्र पाटील यांच्याच नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणाहून सकाळी 11 वाजता मोर्चा सुरू होईल. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. तरी आंदोलक मोर्चा वर ठाम आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा जाईल असे सांगण्यात आले आहे. मात्र माहितीनुसार पोलीस चार पुतळा चौकात मोर्चा थांबवतील. शहरात 2 हजार ग्रामीण भागात 2 हजार पोलिसांचा फौजफाटा असणार आहे. शहरात येणारे सर्व मार्गवर नाकेबंदी करण्यात येत आहे. दरम्यान मराठा आक्रोश मोर्चाला सोलापूर शहर पोलीसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक राम जाधव, किरण पवार यांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी मराठा आक्रोश मोर्चा काढणारच अशी भूमिका आयोजकांनी घेतली आहे.
दरम्यान सोशल मीडियावर पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली असल्याचे खोटे संदेश फिरत आहेत. पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिलेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने मोर्चा, आंदोलनास मनाई केली आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.