Vasai : पालकांनो तुमची मुलं काय करतात?, खेळण्यातल्या कारसाठी लहान मुलांकडून चोरी : ABP Majha
विचारण्याचं कारण म्हणजे वसईत घडलेली एक धक्कादायक घटना. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज प्रत्येक पालकानं आपल्या मुलांवर बारकाईनं लक्ष ठेवण्याची गरज दाखवून दिली आहे. पालकांनी खेळण्यातली मॉडर्न कार घेऊन दिली नाही, म्हणून वसईत दहा वर्षांच्या दोन मुलांनी चक्क चोरी करण्याचा पर्याय स्वीकारला. वसई पश्चिम येथील नवयुग नगर परिसरात या दोन मुलांनी तळमजल्याच्या एका बंद घरात टॉयलेटची काच फोडून प्रवेश केला. त्या दोघांनी त्या घरातून तब्बल १८ हजार रुपयांची चोरी केली. या प्रकरणाचा तपास करत असताना वसईच्या माणिकपूर पोलिसांना माहिती मिळाली की, एका इलेक्ट्रॉनिक खेळण्याच्या दुकानात एक महागडी कार खरेदी करण्यासाठी दोन लहान मुलं आली होती. त्यानंतर तपासाची चक्र वेगानं फिरली. पोलिसांनी त्या दोन मुलांची चौकशी केली असता त्यांनी आपण इलेक्ट्रॉनिक कार विकत घेण्यासाठी चोरी केल्याची कबुली दिली.


















