(Source: Dainik Bhaskar)
BJP And Nawab Malik : सत्ताधारी आणि भाजप संघर्ष आणखीन वाढणार, मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्टिंग ऑपरेशनचा पेन ड्राईव्ह सादर करून सत्ताधाऱ्यांना हादरा दिला. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची घोषणा काल गृहमंत्री दिलीप वेळसे पाटील यांनी केली. या प्रकरणानंतर सत्ताधारी आणि विरोधकांचा संघर्ष कायम आहे. फडणवीस यांनी दुसरा पेन ड्राईव्ह सादर करत वक्फ बोर्डाच्या सदस्याचा दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आजही आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीदेखिल आक्रमक होण्याची शक्यता आहे. प्रवीण दरेकर यांच्यावर दोन दिवसांत एफआयआर दाखल होणार असल्याचं फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. संजय पांडे यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांवर गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झाल्याचा दावाही विरोधी पक्ष करतोय. त्यामुळे पुढच्या काळात दोन्हीबाजूंनी संघर्ष वाढण्याची चिन्हं आहेत.