Parliament Monsoon Session | आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन, कोरोनामुळं अधिवेशनात अनेक महत्वाचे बदल
आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला (Parliament Monsoon Session) सुरुवात होत आहे. कोरोना काळात होणाऱ्या या संसदेच्या अधिवेशनात अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडणार आहेत. त्यासाठी वेगवेगळी व्यवस्थाही करण्यात येत आहे. नेमके काय बदल, आणि कुठल्या महत्वाच्या विधेयकांची चर्चा या अधिवेशनात अपेक्षित आहे. राज्यसभा सकाळी 9 ते 1 आणि लोकसभा दुपारी 3 ते 7 अशा दोन सत्रांमध्ये हे कामकाज होणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच एका सभागृहाच्या कामकाजासाठी दोन सभागृहं वापरली जाणार आहेत. म्हणजे लोकसभेचे कामकाज सुरु असताना लोकसभेचे खासदार राज्यसभेतही बसलेले आढळलेले आढळतील.
या अधिवेशनात सरकार एकूण 23 विधेयकं सादर करणार आहे. त्यापैकी 11 हे अध्यादेश आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळात सरकारनं काही निर्णय लागू करण्यासाठी अध्यादेश काढले होते. जसं की कोरोना वॉरियर्स, डॉक्टर, नर्सेस, आशा वर्कर्स यांच्यावर कुणी हल्ला केल्यास त्याला अधिक कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.