Zero Hour Dhangar Reservation : राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटणार? सरकार जीआर काढणार?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअकोले : राज्य सरकारकडून (Maharashtra Government) धनगड (Dhangad) आणि धनगर (Dhangar) एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी याबाबत माहिती दिली. आता या निर्णयाला महायुतीच्याच (Mahayuti) नेत्यांमधून विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे (Kiran Lahamate) यांनीही महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला (Reservation) धक्का लावू नका. तसं झालं तर उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल, असा इशाराच डॉ.किरण लहामटे यांनी महायुती सरकारला दिला आहे.
डॉ. किरण लहामटे म्हणाले की, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा ज्यांनी कोणी निर्णय घेतला त्यांचा मी निषेध करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 47 जमातींना आरक्षण दिलंय आणि त्यात कोणाचाही समावेश होवू शकत नाही. घटनेची कोणी पायमल्ली करू नये. धनगर समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर स्वतंत्र द्या. धनगर आणि आदिवासी समाजाचा काही संबध नाही. त्यांची संस्कृती स्वतंत्र आहे. सरकार असं का विचार करतंय? किंवा काही संघटनांना का वाटतंय की आदिवासी समाजात आरक्षण मिळावं. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका. तसं झालं तर उग्र स्वरूपाचं आंदोलन केल जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
धनगरांना स्वतंत्र आरक्षण द्यावं
ते पुढे म्हणाले की, मुंबईला जो पाणीपुरवठा होतो हा आदिवासी भागातून होतो. त्यामुळे आदिवासी समाजाला कायदा हातात घ्यायला लावू नका. धरणासाठी जमिनी आम्ही दिल्या, शोषण आमचं झालंय. घटनेने आम्हाला जे आरक्षण दिलंय त्यावर जर इतरांचा डोळा असेल तर ते चालणार नाही. आरक्षण दिलं त्याची भरती देखील होत नाही. त्यात आमच्या आरक्षणात दुसऱ्याला घुसवताय, हे निषेधार्ह आहे. सरकारने पुन्हा एकदा डोक ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यावा. धनगरांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, असे त्यांनी लहामटे यांनी म्हटलं आहे.