Zero Hour Prashant Jagtap : दादांच्या शहराध्यक्षांचा दावा हास्यास्पद, आमच्याकडून कोणताही प्रस्ताव नाही
abp majha web team | 12 Nov 2025 09:14 PM (IST)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमधील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दावा केला आहे की, खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना युतीचा प्रस्ताव दिला आहे. या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जोरदार टीका केली आहे. जगताप यांनी म्हटले आहे की, 'अशाप्रकारे कुठलाही प्रस्ताव आमच्या पक्षाकडून त्यांच्याकडे गेलेला नाही.' पुणे शहरात किंवा जिल्ह्यात भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गट असलेल्या महायुतीसोबत कोणत्याही प्रकारची आघाडी किंवा युती केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार गटाची भूमिका स्पष्ट करताना जगताप म्हणाले की, आम्ही केवळ महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासोबतच आघाडी करू. चंदगडसारख्या लहान नगरपालिकांमधील स्थानिक आघाड्यांचा संबंध राज्याच्या राजकारणाशी जोडू नये, असेही ते म्हणाले.