Special Report | 1975च्या आणीबाणीवर राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्लीः काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्या आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेली आणीबाणी एक चूक होती असं म्हटलं आहे. अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात भारताचे माजी मुख्य सल्लागार कौशिक बसु यांच्यासोबत व्हर्च्युअल चर्चेत राहुल गांधींनी हे वक्तव्य केलं आहे.
आणीबाणी चुकीची होती, माझ्या आजीनंही (इंदिरा गांधी) तसं म्हटलं होतं. पण त्यावेळी जे झालं आणि आज देशात जे होतंय या दोन्हीत फरक आहे. कारण काँग्रेस पक्षाने कधीही घटनात्मक संरचना बळकावण्याचा प्रयत्न केला नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
ते म्हणाले की, काँग्रेसनं भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढाई लढली आहे. देशाला संविधानं दिलं आणि समानता निर्माण केली. राहुल गांधी यांनी यावेळी म्हटलं की, विद्यमान सरकार भारताच्या लोकशाही व्यवस्थेला नुकसान पोहोचवत आहे. प्रत्येक संस्थेच्या स्वायत्ततेवर हल्ला केला जातोय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रत्येक ठिकाणी घुसखोरी करत आहे. न्यायव्यवस्था, निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त यंत्रणांवरही एका विचारधारेचा पगडा आहे. माध्यमांपासून ते कोर्टापर्यंत सर्वांना लक्ष्य केलं जात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
ते म्हणाले की, आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. चर्चेवेळी माईक बंद केला जातो. लोकशाहीवर मोठा हल्ला होतोय. मणिपूरमध्ये राज्यपाल भाजपची मदत करत आहेत. पुदुच्चेरीत राज्यपालांनी अनेक विधेयकं मंजूर होऊ दिली नाहीत. कारण ती आरएसएसशी संबंधित होती. भारतात आता हुकूमशाही सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.