Mirgaon Landslide Satara : अठरा तास ढिगाऱ्याखाली राहून 65 वर्षीय सरसाबाईंची मृत्यूवर मात
Satara Landslide : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मिरगाव येथे घडलेल्या दुर्घटनेत सहा जणांचे मृतदेह काल एनडीआरएफ आणि ग्रामस्थांनी बाहेर काढले. अद्यापही सहा लोक अडकल्याची शक्यता आहे. कालच्या दिवसभरात पावसाने उघडीप दिली होती. मात्र रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढला. आज सकाळी पावसाने विश्रांती दिलेले आहे. त्यामुळे आज एनडीआरएफची टीम काम करत असताना त्यांना थोडासा दिलासा मिळू शकणार आहे.
आजीबाई बचावल्या
गुरुवारी मध्यरात्री मिरगाववर दरड कोसळल्यानंतर अनेक गावकऱ्यांसह 65 वर्षांच्या सरसाबाई वाकाडेही जमिनीखाली गाडल्या गेल्या. जे वाचले त्यांची अंधारात पळापळ झाल्याने कोण कुठं अडकलंय हे कुणालाही समजलं नाही. संपूर्ण दिवसभर सरसाबाईंचा शोध न लागल्याने त्यांचीही आशा कुटुंबियांनी सोडून दिली होती. मात्र एक दिवसानंतर बचावकार्य सुरु झालं आणि जमिनीखालून आवाज येत असल्यानं तिथं पाहीलं असता फक्त डोकं वर असलेल्या अवस्थेत सरसाबाई जिवंत आढळल्या. या प्रसंगाचा धक्का बसल्याने सरसाबाई आज बोलण्याच्या अवस्थेत नाहीत पण त्यांना पाहून सरसाबाईंची मुलगी आणि मुलाला या परिस्थितीतही आनंदाश्रू अनावर झाले.