MNS Morcha | Mira Road मोर्चा परवानगी वाद, चौकशीचे आदेश!
abp majha web team | 08 Jul 2025 07:50 PM (IST)
मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यावरून सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलीस महासंचालकांना जाब विचारल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परवानगी नाकारून पोलिसांना बदनाम करण्याचा हेतू होता का, याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश फडणवीसांनी दिले आहेत. यापूर्वी, मोर्चाच्या परवानगीबाबत बोलताना, जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागितला जात होता, ज्यामुळे संघर्ष निर्माण होऊ शकतो, असे फडणवीसांनी म्हटले होते. पोलिसांचे म्हणणे होते की, त्यांच्याकडे काही इनपुट्स होते की काही लोकांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची कारवाई करायची होती. त्यामुळे पोलिसांनी नेहमीचा मोर्चाचा रूट घेण्यास सांगितले होते, पण मनसेने तो नाकारला. "आम्ही हाच रूट घेणार, दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही," असे त्यांनी सांगितले. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावर आक्षेप घेतला होता. "मोर्चाची परवानगी पोलीस द्यायला तयार नव्हते आणि जो रूट बदलण्याचा विषय आहे तो ते आम्हाला सांगत होते. घटना घडली मीरा रोड मध्ये व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोड मध्ये आणि आम्हाला सांगत होते मोर्चा काढा घोडबंदर रोडला. मला सांगा मीरा रोडमधल्या घटनेचा घोडबंदर ला कोणी मोर्चा काढता का?" असा सवाल त्यांनी केला होता. याचा अर्थ पोलिसांना परवानगी द्यायचीच नव्हती, असा आरोप देशपांडे यांनी केला.