Majha Katta | लॉकडाऊन काळात तमाशा कलावंतांची परवड, रघुवीर खेडकर, मंगला बनसोडेंची व्यथा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्यांनी लोककला काळजापलीकडे जपली, जोपासली, ते तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी आज एबीपी माझा कट्ट्यावर पाहायला मिळाली. कोरोनाच्या संकटात तमाशा कलावंतांच्या आयुष्याची झालेली परवड, त्यांचं दु:ख या दोघांनी रसिकांसमोर मांडले. लॉकडाऊनकाळात समाजातील अनेक घटकांना सरकारने मदत केली. मात्र, अद्याप तमाशा कलावंतांना कोणतीही मदत न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
ज्या लोककलावंतांना स्टेजवर अनेकदा वन्स मोर दिला जायचा. आज त्यांना एकवेळ जेवणासाठी पडेल ते काम करावं लागत असल्याचे दुःख मंगला बनसोडे यांनी सांगितले. तर मी उपोषण केलं त्यानंतर सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी फोन करुन बोलावून घेतलं. आम्ही तिथं गेल्यानंतर मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही फुल ना फुलाची पाकळी मदत करू असं त्यांनी आश्वासन दिलं. मात्र, त्यानंतर पुन्हा तीन महिने काहीच नाही. त्यानंतर, चित्रपटगृह, नाटकं, लावणीचे कार्यक्रम, आठवडी बाजार, असं सर्वकाही सुरु झालं. मात्र, तमाशा अजूनही बंदच आहे, अशी व्यथा रघुवीर खेकडर यांनी आपली व्यथा मांडली.
तमाशा हा मुख्यत्वेकरुन गावागावातील जत्रा, यात्रांवर चालतो. मात्र, कोरोनामुळे यावर निर्बंध आल्याने तमाशा पूर्णपणे बंद आहे. आम्ही या संदर्भात शरद पवार यांच्याकडे गेलो ते म्हणाले आम्ही मदत केली. पण, ती आमच्यापर्यंत पोहचली नाही. नंतर कळलं की ती संगीत बारीवरील कलाकारांना मिळाली. शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात अशा सर्व राजकीय नात्यांकडे गेलो. मात्र, या सर्वांकडून पाच रुपयेही मदत मिळाली नसल्याचे मंगला बनसोडे म्हणाल्या. या कोरोनामुळे अनेक तमाशे बंद झाले. महराष्ट्रात लहान-मोठे असे शंभराच्यावर तमाशा मंडळे असतील अशी माहिती रघुवीर खेडकर यांनी दिली. तिकीटावरही तमाशा करणेही परवडत नाही. पूर्वी दीड ते दोन हजार प्रेक्षक यायचे मात्र, आता पाचशे ते सहाशे प्रेक्षक येत असल्याचे खेडकर यांनी सांगितले.