भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज युसुफ पठाणने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. याची माहिती त्याने स्वत: सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली. भारताकडून 57 एकदिवसीय आणि 22 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार्‍या युसुफने मार्च 2012 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अंतिम आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.


निवृत्तीची घोषणा करताना युसुफ म्हणाला, "मी माझ्या कुटुंबाचे, मित्रांचे, चाहते, संघ, प्रशिक्षक आणि संपूर्ण देशाचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला साथ दिली आणि खूप प्रेम दिले."


युसुफ पठाण म्हणाला, "मला आजही आठवतंय जेव्हा मी प्रथम भारतीय जर्सी घातली होती, त्यादिवशी मी फक्त इंडियाची जर्सी घातलेली नव्हती तर माझे कुटुंब, मित्र, प्रशिक्षक आणि संपूर्ण देशाच्या स्वप्नांना माझ्या खांद्यावर घेतलं होतं." मी लहानपणापासूनच क्रिकेटमध्येच माझे आयुष्य व्यतीत केले आहे. मी माझ्या कारकीर्दीत देशाकडून खेळलो, घरगुती क्रिकेट खेळलो आणि आयपीएलमध्येही खेळलो."


आपल्या कारकीर्दीतील एका अविस्मरणीय क्षणाचा संदर्भ देताना तो म्हणाला, की "भारतासाठी वर्ल्डकप जिंकणे आणि सचिनला खांद्यावर उचलून घेणे माझ्या कारकीर्दीतील एक अविस्मरणीय क्षण आहे. आता माझ्या क्रिकेटवर पूर्णविराम लावण्याची वेळ आली आहे.




युसूफ पठाण हा विश्वचषक फायनलमध्ये पदार्पण करणारा एकमेव क्रिकेटपटू
युसुफ पठाणने 2007 मध्ये पाकिस्तान विरुद्ध टी -20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अंतिम सामन्यात पदार्पण करणारा आणि चॅम्पियन बनणारा तो जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. पदार्पण सामन्यात त्याने आठ चेंडूत 15 धावांची खेळी केली.


अशी होती कारकीर्द
युसुफने 57 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8 शतके आणि 33 बळी घेतले. याशिवाय त्याने 22 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 236 धावा आणि 13 बळी घेतले. युसूफने 174 आयपीएल सामन्यात 3204 धावा आणि 42 विकेट्स घेतल्या.