मुंबई : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात भाजपच्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ज्या दिवशी पूजा चव्हाणचा मृत्यू झाला त्या दिवशी संजय राठोड यांच्या मोबाईल वरून पूजाच्या मोबाईलवर 45 कॉल्स आले होते, असा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात या मोबाईलवर फोन का आले होते? याची पोलिसांनी चौकशी करावी आणि त्याची माहिती लोकांसमोर द्यावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
पुणे पोलिसांनी या प्रकरणात अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दुसर्या सक्षम अधिकाऱ्याची या प्रकरणाचा तपास अधिकारी म्हणून नेमणूक करावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. वानवडी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुजोरी सर्वांनी पाहिली. पुणे पोलीस आयुक्तांनीही एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. माझे प्रश्न मात्र त्यांनी लिहून घेतले आहेत, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.
भाजपनंतर संजय राठोडांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर स्वकीयांचा दबाव : सूत्र
पुणे पोलीस आयुक्तांना चित्रा वाघ यांनी प्रश्न विचारले की, पूजाचा मृत्यू झाला त्या दिवशी तिच्या मोबाईवर अनेक मिस्ड कॉल आले आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या फोनवर जे मिस्ड कॉल आले आहेत त्याची स्पष्टता पोलीस जनतेला देतील का? 100 नंबरवर जे फोन आले त्याची माहिती पोलीस जनतेला देतील का? पोलिसांनी जप्त केलेल्या फोनवर कुणाचे मिस कॉल आले? हे पोलिसांना सांगावं.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून घ्यावा आणि हा तपास एखाद्या सक्षम आयपीएस अधिकाऱ्याला सोपवावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी राज्याच्या पोलीस महासचालकांकडे केली आहे. आमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे पुणे पोलिसांनी दिलेले नाहीत. सगळे पुरावे असतानाही पोलीस आणि सरकार कुणाचा वाट पाहते आहे, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.