मुंबई : यष्टिरक्षक रिद्धिमान साहाने प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधली आपली सर्वोत्तम खेळी उभारून, इराणी करंडकावर शेष भारताचं नाव कोरलं आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवरच्या या सामन्यात शेष भारताने गुजरातला पराभवाची धूळ चारली.
गुजरातने शेष भारताला विजयासाठी 379 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना शेष भारताची परिस्थिती चार बाद 63 अशी बिकट झाली होती. त्या परिस्थितीत रिद्धिमान साहाने कर्णधार चेतेश्वर पुजाराच्या साथीने पाचव्या विकेटसाठी 316 धावांची अभेद्य भागीदारी रचून शेष भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
या त्रिशतकी भागिदारीत रिद्धिमान साहाचा नाबाद 203 धावांचा वाटा होता. त्याने 272 चेंडूंमधली ही खेळी 26 चौकार आणि सहा षटकारांनी सजवली. चेतेश्वर पुजाराने 238 चेंडूंत 16 चौकारांसह 116 धावांची खेळी उभारली.