मुंबई: शिवसेनेचा दहिसरमधील अंतर्गत वाद चिघळला आहे. आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी तक्रार मागे घ्यावी, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे.

अभिषेक घोसाळकर यांच्या तक्रारीमुळे शिवसेनेचे नगरसेवक शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बोरिवलीतील एमएचबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

ही तक्रार मागे न घेतल्यास, शिवसेनेकडून अभिषेक घोसाळकरांना नोटीस पाठवण्यात येणार आहे.

या तक्रारीमुळे तीनही उमेदवारांची उमेदवारी धोक्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवकांची संख्या कमी होऊ नये म्हणून पक्षप्रमुखांची डोके दुखी वाढली आहे.

काय आहे प्रकरण?

दहिसरच्या एलआयसी कॉलनीत एक खासगी उद्यान पालिकेने ताब्यात घेतलं आहे. या उद्यानाचं नूतनीकरण करण्यात आलं. त्यासाठी माजी महापौर, नगरसेविका शुभा राऊळ, शिवसेनेचे नामनिर्देशित नगरसेवक अवकाश जाधव यांचा नगरसेवक निधी, तर आमदार रामदास कदम यांचा आमदार निधी वापरण्यात आला.

कर्मयोग उद्यान नावाने हे सर्वश्रुत आहे. या उद्यानाचं 10 जानेवारीला उद्घाटन झालं.

मात्र आचारसंहिता जारी झाल्यानंतर काही दिवसांनी, म्हणजेच 14 जानेवारीला रोजी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून या परिसरातील सामाजिक संस्था आणि स्थानिक रहिवाशांनी कर्मयोग उद्यानात स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला शुभा राऊळ यांच्याबरोबर नगरसेविका शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

पण शिवसेनेचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा या सर्व प्रकाराला आक्षेप होता.  आचारसंहिता लागू असताना या कार्यक्रमात कर्मयोग उद्यानाचे उद्घाटन करण्यात आलं, असा दावा शिवसेनेचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी केला होता.

निवडणुका जाहीर झाल्यानंतर उद्यानाचे उद्घाटन झाल्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी घोसाळकर यांनी केली होती.

संबंधित बातम्या
घोसाळकरांनी करुन दाखवलं, शिवसेनेच्या तीन नगरसेवकांवर गुन्हा!

प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, माजी महापौर शुभा राऊळ यांचं पत्र