बहुचर्चित सागर धनखड पैलवान हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपपत्र तयार केले असून ते उद्या न्यायालयात दाखल करणार आहे. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सुशील कुमार हा या हत्येतील मुख्य आरोपी आहे. सुशील कुमारसह 20 आरोपी या प्रकरणात सहभागी आहेत.

Continues below advertisement


सुमारे तीन महिन्यांच्या मॅरेथॉन तपासणीनंतर पोलिस सोमवारी सागर हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार आहेत. या आरोपपत्रात पैलवान सुशील कुमारला मुख्य आरोपी बनवण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आली असली, तरी आरोपपत्रात आणखी काही आरोपी आहेत, ज्यांना दिल्ली पोलीस अजूनही शोधत आहेत.


सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलीकडेच दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने अटक केलेल्या काला जथेडीची लवकरच गुन्हे शाखेकडून या प्रकरणात चौकशी केली जाईल. सुशील कुमार याने न्यायालयात असेही म्हटले होते की, त्याला काला जथेडीकडून जीवाला धोका आहे. आरोपपत्रात म्हटले आहे की, पैलवान सागर घनखड वर्चस्वाच्या लढाईत मारला गेला.


काय आहे प्रकरण?
4 ते 5 मे दरम्यान रात्री सागरची छत्रसाल स्टेडियममध्ये हत्या
कुस्तीपटू सुशील कुमारने आपल्या अनेक साथीदारांसह 4 आणि 5 मे दरम्यान मध्यरात्री छत्रसाल स्टेडियमध्ये ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखड आणि त्याचा साथीदार सोनू महल या दोघांना मारहाण केली होती. या हल्ल्यात सागर धनकड ठार झाला.


उत्तर रेल्वेकडून सुशील कुमार सेवेतून निलंबित
दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटू सागर धनकड याच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक विजेता सुशील कुमारला अटक झाली. या कारवाईनंतर उत्तर रेल्वेने सुशील कुमारला सेवेतून निलंबित केले आहे. पुढील आदेश येईपर्यंत त्याच्या निलंबनाचा आदेश अबाधित राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सुशील कुमारला अनेक पदोन्नतीनंतर उत्तर रेल्वे येथे डेप्युटी चीफ कमर्शियल ऑफिसर म्हणून नियुक्त केले होते. सागर धनकड हत्या प्रकरणात प्रथम दिल्ली सरकारने पत्र लिहून सुशीलच्या अटकेविषयी रेल्वेला कळवले होते. यानंतर रेल्वे बोर्डाने उत्तर रेल्वेला पत्र लिहिले. यानंतर सुशीलला निलंबित करण्यात आले आहे.