ZIM vs PAK T20 World Cup 2022: झिम्बाव्वे आणि पाकिस्तान (Zimbabwe vs Pakistan) यांच्यात गुरूवारी खेळण्यात आलेल्या सुपर- 12 फेरीतील सामन्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. या सामन्यात झिम्बाव्वेच्या संघानं बलाढ्य पाकिस्तानचा अवघ्या एका धावेनं पराभव केला. या थरारक सामन्यानंतर पाकिस्तानच्या संघात निराशाजनक वातावरण पाहायला मिळालं. तसेच स्टेडियममध्येही शांतता पसरल्याचं चित्र दिसलं. या पराभवानंतर पाकिस्तानचा फलंदाज शादाब खान (Shadab Khan) पव्हेलियनमध्ये रडत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शादाब खान ड्रेसिंग रूमकडं जाणाऱ्या रस्त्यात गुडघ्यावर बसून ढसढसा रडताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका पाकिस्तानी चाहत्यानं रेकॉर्ड केलाय. या व्हिडिओमध्ये पाकिस्तान संघाचा कर्मचारी शादाबला दिलासा देत ड्रेसिंग रूमकडे पाठवताना दिसत आहेत.
व्हिडिओ-
झिम्बाव्वेविरुद्ध अवघ्या एका धावेनं पराभव
झिम्बाव्वेविरुद्ध सामन्यात पाकिस्तानच्या संघाला अवघ्या एका धावेनं पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत झिम्बाब्वेच्या संघानं पाकिस्तानसमोर 131 धावांचं आव्हान ठेवलं. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 129 धावांपर्यंतच मजल मारू शकला. पाकिस्तानकडून शान मसूदनं सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. तर, मोहम्मद नवाजनं 22 धावा केल्या. शादाब खाननं 14 चेंडूत 17 धावांचं योगदान दिलं. शादाब आऊट झाल्यानंतर पाकिस्तानच्या संघाची फलंदाजी पूर्णपणे ढासळली.
पाकिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर होण्याच्या मार्गावर
यंदाच्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानच्या संघानं आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केलीय. पाकिस्तानच्या संघाला या स्पर्धेतील त्यांच्या पहिल्याच सामन्यात भारताविरुद्ध चार विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही झिम्बाब्वेविरुद्ध एका धावेनं पराभवाचा सामना करावा लागला. या दोन्ही थरारक सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.
हे देखील वाचा-